सात चाळीस, मुम्ब्री, ब्रिज आणि बरंच काही

सात चाळीस, मुम्ब्री, ब्रिज आणि बरंच काही 

मुंबईच्या लोकल्स बरेच दिवस बंद होत्या. आता चालू झाल्या आहेत असं ऐकतो. त्यावरून माझ्या लोकल प्रवासाची आठवण झाली. 

तसं पाहता कॉलेज मध्ये असताना (VJTI) माटुंग्याला जायला लागायचं. म्हणून लोकल प्रवास होताच. पण तेव्हा एक अशी ठरलेली लोकल, रोजची अशी नव्हती. कारण रोज पहिलं लेक्चर असायचंच असं नाही. आणि शिवाय तेव्हा कॉलेज मधले मित्र बरोबर असायचे. आणि आम्ही फारच सिरिअस (!) विद्यार्थी असल्यामुळे लेक्चर्स बंक करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार होता (आणि "तो मी बजावणारच!")

नंतर जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मात्र (निरुपायाने!) रोज सकाळी तीच लोकल पकडायला लागायची. परंतु हे Blessing in disguise होतं हे नंतर कळलं. याचं कारण म्हणजे मुंबईच्या लोकल मध्ये, रोजचे जे लोक असतात ते आपोआप जवळ येतात. अर्थात फिजिकली लोकलच्या गर्दीमुळे जवळ येतातच, पण मनानेही जवळ येतात. 

सकाळच्या सात चाळीसच्या लोकल मधले सगळे लोक आता बत्तीस वर्ष झाली तरी पूर्णपणे आठवतात. 

आम्ही बहुतेक वेळा (उभ्या उभ्या) ब्रिज किंवा मुम्ब्री खेळायचो. त्यावेळेचे गद्रे, मणेरीकर, पाल्या (श्रीकांत पालेकर, माझा शाळेतला सवंगडी) वगैरे पूर्ण आठवतायत. आणि पाल्यांनी आठवण करून दिली आहे, ते म्हणजे शरद गाडगीळ आणि महेश शानभाग. तेव्हा आमच्या बरोबर काही विद्यार्थी पण असायचे. मला आठवतं आहे, की जेव्हा त्यांच्या परीक्षा असायची तेव्हा सगळे लोक त्यांना जागा द्यायचे, आणि त्यांना last मिनिट वाचायला प्रोत्साहन द्यायचे. कोणी काही दिवस दिसलं नाही तर चौकशी करायचे. तेव्हा मोबाईल तर सोडाच पण साधे फोनसुद्धा कॉमन नव्हते. 

मुम्ब्री हा एक अफलातून खेळ आहे. यामध्ये पानं फारशी पिसली जात नाहीत, आणि सलग १३ पानं एकाला अशी वाटली जातात. त्यामुळे एकदम भयानक चांगला किंवा अतिशय वाईट असे डाव येतात. "त्रूप्स काढ, त्रूप्स काढ" असं पाल्या कायम म्हणायचा. गुजराती लोकांच्यात हा खूप पॉप्युलर होता. 

ब्रिज खेळणारे सीनियर लोक होते (गद्रे साहेब!) त्यांची वेगळीच पद्धत होती. ते लोक रविवारी सकाळी (रामायण असायचं त्यावेळी) ठाण्याला स्टेशनवर जमायचे. ठाणे-VT गाडीत फर्स्ट क्लासमध्ये बसायचे, आणि ठाणे-VT-ठाणे निवांतपणे ब्रिज खेळायचे. त्याच्या मते घरचे सगळे रामायण आणि बाकी गोष्टी TV वर बघायचे, हे लोक घरात आहेत का बाहेर ... कुणाला काही पडी नसायची. मग, चला... ब्रिज खेळा! 

मणेरीकर हे वेगळंच रसायन होतं. हा माणूस टेलिफोन ऑपरेटर होता. अतिशय सज्जन. मी अमेरिकेला आल्यावर काही वर्ष तो नियमांनी फोन करायचा. टेलिफोन ऑपरेटर म्हणून त्याला इंटरनॅशनल लाईन्स सहज मिळायच्या. आता याचं  अप्रूप कोणालाच वाटणार नाही. पण त्यावेळेला फोन भयानक महाग होते. 

आता हे सगळे कुठे आहेत कोणास ठाऊक. पाल्या अर्थातच कॉन्टॅक्ट मध्ये आहे. 

मुंबई लोकल्स हे अजब रसायन आहे! 

Comments